२० मे, २०२१ रोजी अद्यतनित (अपडेट) केलेले
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड- १९ (अर्थात कोरोना विषाणू) च्या झालेल्या उद्रेकाला ११ मार्च २०२० रोजी वैश्विक साथ म्हणून घोषित केले. कोविड संदर्भातील जागतिक परिस्थिती सतत बदलत आहे. सामोरी येणारी कोरोना विषाणूची नवीन नवीन उत्परिवर्तित रूपे (variants) आणि एकूण लसीकरणाचे प्रमाण, यावर अवलंबून त्यानुसार अनेक देश त्यांचे प्रवासावरील निर्बंध तसेच एकूण सुरक्षिततेचे नियम शिथिल करत आहेत, किंवा काही ठिकाणी अजून कडक करत आहेत, असे हाती येणाऱ्या वृत्तानुसार कळते.
हा विषाणू आणि त्याला रोखण्यासाठी सरकारकडून उचलली जाणारी पावले याबाबत जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात जगभरातील पत्रकार महत्वाची भूमिका बजावत आहेत. ह्या वार्तांकनासाठी करावा लागणारा प्रवास, आणि मुलाखतीसाठी विविध माणसांना भेटणे यामुळे पत्रकार मात्र संकटात सापडू शकतात. कारण ह्या सर्वांदरम्यान विषाणूची लागण होण्याचा धोका पत्रकारांसमोर सतत उभा ठाकलेला असतो.
निर्बंधांबद्दलच्या नवनवीन घडामोडींची ताजी माहिती मिळवण्यासाठी कोविड संदर्भातील वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत प्रसृत करण्यात येत असलेली माहिती तसेच स्थानिक आरोग्य खात्यातून प्रसारित होणारी माहिती, याकडे लक्ष ठेवावे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे कोरोना विषाणू माहिती केंद्र (Coronavirus Resource Center) हा या महासाथी बाबतच्या बातम्या मिळवण्यासाठीचा खात्रीचा पर्याय आहे.
वृत्तांकन करताना घ्यायची काळजी
आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम तसेच त्यादरम्यान पाळण्यात येणारे सुरक्षिततेचे नियम हे सध्या सतत बदलत आहेत. त्यामुळे वृत्तांकनाची कामे अचानक किंवा अतिशय थोडीशी पूर्वसूचना देऊन रद्द होऊ शकतात.
लसीकरण झाले असले तरी एखादी व्यक्ती विषाणूची वाहक असू शकते. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झाले आहे, अशा माध्यमकर्मींनी हे लक्षात ठेवावे, असे अमेरिकेतील सीडीसी ने सांगितले आहे. तर येल मेडिसिन च्या मते विषाणूच्या विविध उत्परिवर्तित रूपांविरुद्ध विविध लशी ह्या कमीजास्त पातळीचे संरक्षण पुरवतात. त्यामुळे माध्यमकर्मींनी शारीरिक अंतर बाळगणे तसेच मास्कचा वापर करणे असे कोविड -१९ सुसंगत वर्तन करणे अपेक्षित आहे.
कोविड-१९ चे वार्तांकन करणाऱ्यांनी खालील खबरदारी जरूर घ्यावी.
असाईनमेंट पूर्वी
- शक्य असल्यास, कुठल्याही वृत्तांकनाच्या कामासाठी जाण्यापूर्वी कोविड -१९ ची लस घेण्याचा जरूर विचार करा. विशेषतः जर तुम्ही कोविड-१९ चा जास्त संसर्ग आहे, अशा भागात जात असाल, तर लसीकरण करून घेणे योग्य राहील.
तुमच्या भागात संसर्ग होण्याचे प्रमाण किती आहे, यावर अवलंबून ऑनलाईन किंवा दूरध्वनीद्वारे इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करा. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष भेटी शक्यतो टाळा.
- सीडीसीच्या मते, इतर शारीरिक विकार उदा. मधुमेह किंवा अति स्थूलपणा असणाऱ्या लोकांना जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. तुम्ही जर यापैकी कुठल्या गटात मोडत असाल, किंवा परिसरात जंतुसंसर्गाचे प्रमाण अधिक असेल, तर ज्यासाठी लोकांच्या थेट संपर्कात यावे लागेल, असे कोणतेही वृत्तांकनाचे काम टाळा. गरोदर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.
- कोविड- १९ वृत्तांकनासाठी कर्मचारी निवडताना विशेष काळजी घ्या. काही विशिष्ट राष्ट्रीयत्वाच्या लोकांविरुद्ध वांशिक हल्ले होणार नाहीत ही खबरदारी घ्यावी लागेल. न्यूयॉर्क टाइम्स ने हे सांगितले आहे
- प्रवासाचे निर्बंध आणि टाळेबंदी संदर्भात जगभरातली परिस्थिती कोणतीही पूर्व सूचना न देता बदलू शकते. तुम्ही जर वृत्तांकनादरम्यान आजारी पडलात तर तुम्हाला सहाय्य्य करण्यासाठी तुमच्या व्यवस्थापनाने काय योजना आखली आहेत, याची सविस्तर चर्चा करा.
मानसिक स्वास्थ्य
- ऑक्सफर्ड विद्यापीठातील रॉयटर्स इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालानुसार, कोविड-१९ च्या वार्तांकनादरम्यान अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ पत्रकारांनादेखील मानसिक तणावातून जावे लागण्याची शक्यता आहे
- कोविड -१९ ग्रस्त ठिकाणाहून किंवा प्रदेशातून, टाळेबंदी मधून वार्तांकन करण्याचा संभाव्य मानसिक परिणाम लक्षात घ्या. मानसिक आघात होऊ शकेल अशा परिस्थितीत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी The DART Center for Journalism and Trauma यांनी उपयुक्त संसाधने तयार केली आहेत, त्याचा जरूर लाभ घ्या. कोविड-१९ चे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी मानसिक स्वास्थ्य राखण्याच्या उपयुक्त सूचना सीपीजेच्या इमर्जन्सी पेज वर मिळू शकतील
स्वतःला आणि दुसऱ्यांना संसर्ग होण्यापासून दूर ठेवणे
तुम्ही कुठल्या देशात आहात, त्यानुसार शारीरिक/सामाजिक अंतर पाळण्याचे नियम वेगळे असू शकतात. खाली दिलेल्या यादीतील एखाद्या ठिकाणी जर तुम्ही वार्तांकन करत असाल, तर तेथे गरजेच्या सुरक्षा नियमनाची आधीच चौकशी करा.
- दवाखाना,
- वृद्धाश्रम
- ज्या घरात आजारी, वृद्ध, गरोदर अथवा इतर विकारांनी ग्रस्त व्यक्ती असेल, असे कुठलेही घर
- जेथे विषाणू संसर्गाचा धोका मुळातच जास्त आहे, असे कुठलेही ठिकाण (उदा. मांसावर प्रक्रिया केली जाते असे ठिकाण)
- शवागार, स्मशानभूमी
- विलगीकरण क्षेत्र
- शहरामधील दाटीवाटीची लोकवस्ती असणारा भाग उदा. (झोपडपट्टी अथवा गरीब वस्ती)
- कोविड –१९ चे रुग्ण असलेली एखादी निर्वासितांची छावणी अथवा तुरुंग
सामान्यतः संसर्ग होऊ नये यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचना खालीलप्रमाणे:
- स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार जेवढे गरजेचे आहे, तेवढ्या शारीरिक अंतराचे पालन करा. सर्दी, खोकला अशा प्रकारच्या श्वासांशी संबंधित विकारांची लक्षणे ज्यांच्यामध्ये दिसत असतील, त्यांच्यापासून विशेषतः दूर राहा. वयस्कर माणसे, काही विकार असणारे रुग्ण, आजाराची लक्षणे असणारी माणसे, त्यांच्या जवळची माणसे, कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणरे डॉक्टर अथवा परिचारक, धोकादायक जागी काम करणारी माणसे, अशा सर्वांपासून सुरक्षित अंतर राखा.
- शक्य तेवढ्या प्रमाणात मुलाखती घेताना बाहेर खुल्या जागी घ्या. बंदिस्त ठिकाणीच मुलाखत घ्यायची वेळ आली, तर हवा खेळती असेल असे ठिकाण ( उदा. उघड्या खिडक्या असलेली खोली) शोधा. बंदिस्त, कोंदट जागा टाळा.
- कोणाशीही हस्तांदोलन अथवा मिठी मारणे अथवा चुंबन टाळा.
- समोरासमोर उभे राहून मुलाखत घेण्या ऐवजी थोडासा कोन साधून तिरके उभे राहा. योग्य तेवढे शारीरिक अंतर राखा.
- गरम पाणी आणि साबण याचा वापर करून, नियमितपणे, नीट, वीस सेकंद हात धुणे गरजेचे आहे. हात धुऊन झाल्यावर ते नीट कोरडे होतील असं बघा. आपले हात नीट धुणे आणि कोरडे करणे यावर जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) वेबसाईटवर असणाऱ्या मार्गदर्शक सूचना पहा.
- जर गरम पाणी आणि साबण उपलब्ध नसेल तर जीवाणू नष्ट होण्याचे जेल अथवा वाईप्स वगैरे वापरायला हरकत नाही. पण त्यानंतर लवकरात लवकर साबण आणि पाणी वापरून हात धुवा. (सीडीसीने दिलेल्या सूचनेनुसार, ६० टक्क्यांहून अधिक इथेनॉल अथवा ७० टक्क्यांहून अधिक इसोप्रोपानोल असणारे अल्कोहोलयुक्त सेनीटायझर वापरायला हरकत नाही). मात्र नियमितपणे हात धुण्याला पर्याय नाही. त्याऐवजी म्हणून सेनीटायझर वापरू नका.
- खोकताना आणि शिंकताना कायम नाक आणि तोंड झाकून घ्या. जर तुम्ही नाक-तोंड झाकायला टिशूपेपरचा वापर करत असाल तर ताबडतोब त्याची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे ध्यानात ठेवा आणि त्यानंतर ताबडतोब तुमचे हात स्वच्छ धुवा.
- बीबीसीने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सतत आपल्या चेहऱ्याला, कानांना, नाकाला, तोंडाला स्पर्श करणे टाळा.
- इतर लोकांनी वापरले असू शकतील असे कप, ताटल्या, काटे चमचे वापरणे टाळा
- केस झाकले जाणे गरजेचे आहे. केस लांब असल्यास त्यांना योग्य त्या प्रकारे बांधून ते झाकून घेणे श्रेयस्कर राहील.
- कोविड-१९ चा विषाणू अनेक वेगवेगळ्या पृष्ठभागांवर, अनेक काळ जिवंत राहू शकतो, हे लक्षात घेता कोणत्याही वृत्तांकनापूर्वी अंगातील घड्याळ आणि इतर दागिने काढून ठेवा.
- जर चष्मा लावत असाल, तर नियमितपणे गरम पाणी आणि साबणाने तो स्वच्छ करत चला.
- वार्तांकनाच्या कामगिरीवर असताना कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळा. त्यामुळे तुमच्या डोळ्याला सतत स्पर्श होऊन जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
- काही प्रकारची कापडे धुण्यास जास्त सोपी असतात, हे लक्षात घेऊन आपल्या कपड्यांची निवड करा. कोणत्याही वृत्तांकनानंतर परिधान केलेले सर्व कपडे गरम पाणी आणि साबणाने नीट धुतले गेले पाहिजेत.
- असाइनमेंटवर असताना रोख पैशांचे व्यवहार शक्यतोवर टाळा. तुमची कार्ड्स, पाकीट आणि पर्स वारंवार आणि नीट स्वच्छ करा. स्वतःच्या खिशात हात घालणे शक्य तेवढे टाळा.
- असाइनमेंटवर असताना रोख पैशांचे व्यवहार शक्यतोवर टाळा. तुमची कार्ड्स, पाकीट आणि पर्स वारंवार आणि नीट स्वच्छ करा. स्वतःच्या खिशात हात घालणे शक्य तेवढे टाळा.
- स्वतःचे वाहन वापरणार असाल, तर एखादी विषाणूची लागण झालेली व्यक्ती इतरांपर्यंत तो संसर्ग फैलावू शकते, याची जाणीव ठेवा. वाहनाच्या खिडक्या खाली करा जेणेकरून वाहनात हवा खेळती राहील. आणि वाहनाच्या आत बसलेले असताना चेहऱ्याला मास्क लावा
- ठराविक काळाने विश्रांती घ्या. शरीरातील थकवा आणि ऊर्जा यांवर नीट लक्ष ठेवा. दमलेल्या व्यक्तीकडून स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा होण्याची शक्यता असते. त्याचसोबत, अनेक जणांना कामाच्या ठिकाणी येण्यासाठी आणि जाण्यासाठी बरेच अंतर कापावे लागते, याचीही जाणीव ठेवा.
स्वसुरक्षेची वैद्यकीय साधने
- पत्रकारांनी विविध प्रकारची वैयत्तिक सुरक्षेची साधने (पीपीइ किट्स) वापरणे गरजेचे आहे. कोणत्या प्रकारची साधने वापरावी हे वार्तांकनाच्या प्रकारावर अवलंबून राहील. उदा. रबरी हातमोजे, चेहऱ्याचे मास्क्स, एप्रन, पूर्ण पीपीई किट, इ.
- सुरक्षित प्रकारे पीपीई किट अंगावर चढवणे आणि अंगावरून काढणे यामध्ये व्यवस्थित खबरदारी घेणे आवश्यक आहे. या बाबतीत सीडीसी ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा. विशेषतः पीपीई किट अंगावरून उतरवताना अतिशय खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण त्या वेळी जंतुसंसर्गाची शक्यता सर्वात जास्त असते. या बाबतीत कुठलीही शंका असल्यास, वार्तांकनाच्या कामगिरीवर जाण्यापूर्वी योग्य तो सल्ला आणि प्रशिक्षण घ्या.
- काही प्रदेशांमध्ये उत्तम प्रतीच्या पीपीई किटचा पुरवठा होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
- आपल्या शरीरास साजेशा आकाराचे पीपीई किट वापरा. खूप घट्ट असल्यास हालचाल करण्यात पीपीई किट ने अडथळा येऊ शकतो, अथवा खूप सैल असल्यास विविध गोष्टींमध्ये अडकून ते फाटू शकते.
- उत्तम आणि नावाजलेल्या ब्रॅण्ड्स चेच पीपीई किट वापरा. बनावट आणि नकली मालापासून सावध रहा. काही उत्तम प्रतीच्या ब्रॅण्ड्स ची यादी येथे पहा.
- एखाद्या विषाणूचा संसर्ग झालेल्या ठिकाणी काम करत असाल, अथवा अशा ठिकाणाला भेट देत असाल (उदा. दवाखाना), तर प्रतिबंधक हातमोजे वापरा.
- जिकडे विषाणूचा प्रादुर्भाव असेल अशा एखाद्या ठिकाणी (उदा. दवाखाना अथवा शवागार) काम करत असाल, तर पूर्ण बॉडी सूट आणि चेहऱ्याच्या मास्कची नक्कीच गरज आहे.
- पूर्ण बॉडी सूट घालत असाल, तर तो अंगावर चढवण्यापूर्वीच स्वच्छतागृहाचा वापर करून घ्या.
- त्या त्या असाइनमेंटच्या स्वरूपानुसार एकदा वापरून टाकून द्यायची पादत्राणे वापरा अथवा जलरोधक पादत्राणे वापरा. त्या ठिकाणाहून बाहेर पडताक्षणी ही पादत्राणे स्वच्छ घासून धुवा. विषाणू प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रातून बाहेर पडण्याआधी ह्या पादत्राणांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा, जेणेकरून त्यांचा पुनर्वापर होणार नाही .
- प्रशिक्षित तज्ज्ञांच्या उपस्थितीत पीपीई किट चढवणे आणि उतरवणे योग्य राहील. सीडीसीने जारी केलेला हा किट चढवणे आणि उतरवण्याचा व्हिडियो याबाबतीत उपयुक ठरेल. मात्र हा व्हिडियो पाहणे म्हणजे प्रशिक्षण नाही, हे लक्षात ठेवावे.
- एकदा वापरून फेकून देण्याची पीपीई किट्स उदा. हातमोजे, चेहऱ्याचे मास्क, एप्रन, बुटांचे कव्हर पुन्हा वापरू नका. पुनर्वापर अपेक्षित असलेली सर्व साधने ही व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून ठेवावी लागतात हे लक्षात घ्या.
चेहऱ्याचे मास्क
चेहऱयावर लावण्याच्या मास्कचा योग्य वापर हा पत्रकारांसाठी अत्यावश्यक आहे. विशेषतः कोंदट अथवा दाटीवाटीच्या ठिकाणी वावरताना किंवा जंतुसंसर्गाचा धोका जास्त असेल अशा ठिकाणी वार्तांकन करताना त्याची फारच गरज आहे. खुल्या, हवेशीर जागांपेक्षा कोंदट ठिकाणी हवेतील विषाणूंचे प्रमाण नेहमीच जास्त असते. त्यायोगे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोकादेखील जास्त असतो.
नीट वापर न केल्यास, खुद्द मास्कच जंतुसंसर्गाचे साधन बनू शकतो. सर्जिकल मास्कवर वापरानंतर सात दिवसांपर्यंत विषाणू राहू शकतो, आणि तो संसर्ग पसरवू शकतो, असे ‘लॅन्सेट’ मध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे मास्क लावलेला असताना चेहऱ्याला हात लावणे, अथवा मास्क काढून टाकणे, अथवा त्याचा पुनर्वापर करणे याने संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.
मास्क घातला असल्यास पुढील सूचना पाळा.
- कोंदट अथवा बंदिस्त ठिकाणी वार्तांकन करत असल्यास, किंवा संसर्गाचे प्रमाण जास्त असणाऱ्या ठिकाणी वार्तांकन करता असल्यास, साध्य सर्जिकल मास्क ऐवजी N९५ मास्क लावणे योग्य राहील.
- मास्क नीट बसावा यासाठी दाढी/मिशी काढून टाकणे श्रेयस्कर राहील.
- मास्कला सतत स्पर्श करणे टाळा आणि तो काढताना केवळ त्याच्या पट्ट्याला धरून काढा. मास्कच्या पुढच्या बाजूला स्पर्श करू नका
- कोणत्याही मास्कचा पुनर्वापर करू नका. तसेच मास्क वापरून झाल्यावर त्याची ताबडतोब हवाबंद पिशवीत घालून विल्हेवाट लावा.
- मास्क काढल्यानंतर नेहमी गरम पाणी आणि साबणाने अथवा अल्कोहोल बेस्ड सेनिटायझरने (ज्यात ६० टक्क्याहून अधिक इथेनॉल किंवा ७० टक्क्याहून अधिक इसोप्रोपेनॉल असेल अशा) हात धुवा.
- कोणताही मास्क ओलसर अथवा चिकट झाल्यावर लगेच तो बदलून नवीन स्वच्छ कोरडा मास्क वापरायला लागा.
- स्वतःची काळजी घेण्याचे मास्क हे केवळ एक साधन आहे हे लक्षात ठेवा. त्याच्या सोबत नियमित हात धुणे आणि सतत चेहरा, डोळे, नाक, तोंड आणि कान यांना स्पर्श करण्याचे टाळणे ह्या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत.
- एखाद्या ठिकाणी चेहऱ्याच्या मास्कचा बाजारात तुटवडा असू शकतो अथवा त्याच्या किमतीत अचानक प्रचंड वाढ होऊ शकते, हे लक्षात घ्या
उपकरणांची काळजी
- जिथे शक्य तिथे सुरक्षित अंतरावरून ‘फिशपोल’ पद्धतीचे माईक वापरावे. सर्व प्रकारचे सुरक्षेची खबरदारी घेतली असेल अशाच वातावरणात ‘क्लिप’ पद्धतीचे माईक वापरावे
- प्रत्येक वार्तांकनाच्या आधी व नंतर माईकची झाकणे आणि आवरण (कव्हर) अंतर्बाह्य स्वच्छ करण्याची खबरदारी घ्या. कुठ्याही संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी सुरक्षित पद्धतीने कव्हर कसे काढावे, याचे प्रशिक्षण अथवा सल्ला घ्या. विंड मफ प्रकारची कव्हर वापरणे टाळा कारण ती स्वच्छ करावयास अवघड असतात
- विशेषतः पाहुण्यांसाठी, शक्य त्या ठिकाणी, कमी किमतीचे इअरप्लग वापरा आणि एकदा वापरल्यानंतर फेकून द्या. तुम्ही वापरात असलेली इअर प्लग्स प्रत्येक वापरानंतर स्वच्छ पुसून निर्जंतुक करा.
- दूरचे नीट दिसेल अशा प्रकारची लेन्स वापरा जेणेकरून सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होईल
- जिथे शक्य होईल तेथे वायर असणाऱ्या उपकरणांपेक्षा वायरलेस उपकरणे वापरा.
- वार्तांकनाच्या कामगिरीवर असताना तुम्ही उपकरणे कशी ठेवाल याचा नीट विचार करा. इकडेतिकडे पसरलेल्या अवस्थेत काहीही ठेवू नका. सर्व गोष्टी त्यांच्या त्यांच्या डब्यात अथवा ठिकाणी ठेवा. (शक्यतो टणक कव्हर असणाऱ्या डब्या वापराव्या, जेणेकरून त्या स्वच्छ आणि निर्जंतुक करणे सोपे जाईल. )
- शक्य असल्यास उपकरणे वापरत असताना त्याच्या भोवती प्लास्टिकचे वेष्टन घाला. या योगे उपकरणांचा पृष्ठभाग, ज्याद्वारे जंतु संसर्ग होऊ शकतो, तो कमीतकमी राहील तसेच तो निर्जंतुक करणे देखील सोपे जाईल.
- स्वतःसोबत पूर्णतः चार्ज असलेल्या बॅटरी घेऊन जा, आणि कामाच्या स्थळी काहीही चार्ज करणे टाळा, जेणेकरून जंतुसंसर्गाचा धोका उद्भवणार नाही.
- कोणत्याही उपकरणांना निर्जंतुक करण्यासाठी जीवाणू प्रतिबंधक प्रक्रिया जलद गतीने होईल असे वाईप्स वापरा. उदा. मेलीसेप्टल. मोबाईल फोन, प्लग, लीड, इयरप्लग, हार्ड ड्राईव, कॅमेरा, पत्रकारांचे ओळखपत्र, गळ्यात उपकरणे अडकवण्याच्या दोऱ्या, हे सर्व अंतर्बाह्य स्वच्छ करा.
- काम झाल्यानंतर सर्व तांत्रिक उपकरणे परत करताना त्यांचे निर्जंतुकीकरण केले असल्याची खात्री करा. ही उपकरणे हाताळणाऱ्या सर्व व्यक्तीना उपकरणे निर्जंतुक करण्याचे आगाऊ प्रशिक्षण दिले गेले आहे कि नाही, ह्याची खात्री करा. काम झाल्यावर कोणतेही उपकरण स्वच्छता कर्मचाऱ्याला न सोपवता तसेच टाकून दिले जात नाही आहे ना, हे देखील नीट पहा.
विजेवरच्या उपकरणांची स्वच्छता
- विजेवरच्या उपकरणांची स्वच्छता करण्याच्या दृष्टीने काही सर्वसामान्य मार्गदर्शक तत्वे खाली दिली आहेत. कोणत्याही उपकरणाची स्वच्छता करायला घेण्यापूर्वी त्याच्या उत्पादकाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना वाचल्याची खात्री करा
- विजेवरील सर्व उपकरणे, वायर तसेच ऊर्जेचे स्रोत हे परस्परांपासून विलग (अनप्लग) करा.
- कोणतेही द्रव पदार्थ हे तुमच्या उपकरणांपासून लांब ठेवा. ब्लीच, अथवा एरोसोलचे फवारे इ. गोष्टींमुळे तुमच्या उपकरणांची हानी होऊ शकते
- थेट तुमच्या उपकरणावर कशाचाही फवारा उडवू नका
- मऊ, चरे उठणार नाहीत अशा कापडाचा वापर करा.
- ओलसर कापडाचा वापर करा, मात्र ते ओले अथवा भिजलेले असू नये. ओलसर कापडावर तुमच्या हाताने थोडा साबण चोळा
- तुमचे उपकरण दोन तीन वेळा संपूर्णतः पुसून घ्या.
- कापडाची ओल हि कोणत्याही छिद्रात जाणार नाही, याची दक्षता घ्या. (उदा. चार्जिंग सॉकेट, इअरप्लेग सॉकेट, कीबोर्ड)
- तुमचे उपकरण हे स्वच्छ, मऊ आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या.
- कोणत्याही टणक आणि छिद्रे नसलेल्या पृष्ठभागाची स्वच्छता करण्यासाठी काही उत्पादकांनी ७० टक्के इसोप्रोपिल अल्कोहोल वाईप्स वापरायची शिफारस केली आहे.
- काही जंतुनाशकांमुळे उपकरणांना हानी पोहोचू शकते. तुमच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरण करण्याआधी उत्पादकाकडे खात्री करून घ्या
- ह्या लेखामध्ये अजून विस्तृत मार्गदर्शक सूचना वाचा. .
डिजिटल सुरक्षा
- अनेक पत्रकारांना त्यांच्या कोविड-१९ शी संबंधित वार्तांकनानंतर ऑनलाईन टीका अथवा शिवीगाळ अथवा हिंसेला सामोरं जायला लागलेलं असू शकतं. हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सीपीजेच्या या सूचनांचा वापर करा.
- कोविड-१९ चा प्रसार किती झाला आहे याची माहिती मिळण्यासाठी अनेक सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या तंत्रांचा वापर करत आहेत. यामधील एक नाव म्हणजे NSO समूह ज्यांनी पिगेसस नावाचे सॉफटवेअर तयार केले आहे. याचा वापर पत्रकारांवर पाळत ठेवण्यासाठी केला जात आहे, असं citizen lab चं म्हणणं आहे. मानवी आणि नागरी हक्कांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांनी अशी भीती व्यक्त केली आहे, कि कोविड-१९ ची ही साथ संपल्यावर ह्या लोकांवर पाळत ठेवण्याच्या तंत्राचा गैरवापर केला जाऊ शकेल. Transparency International ही संस्था याबाबतीतल्या जागतिक घडामोडी त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहे, ते जरूर पहा.
- ह्या महासाथीचा गैरफायदा घेऊन आरोग्यविषयक, विशेषतः लसीकरणाशी संबंधित गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार सर्रास दिसून येत आहेत.
- कोविड-१९ शी संबंधित कोणतीही कागदपत्रे डाउनलोड कारण्याद्धी किंवा कोणत्याही लिंक वॉर क्लिक करण्याआधी नीट विचार करा. कारण त्या लिंकद्वारे तुमच्या संगणकामध्ये ‘मालवेअर’ पाठवून तुमच्यावर सायबर हल्ला केला जाऊ शकतो, असे इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशनने सांगितले आहे. कोविड-१९ संबंधी समाजमाध्यमे तसेच मेसेंजर ऐप (व्हॉटसअप इ.) वरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घ्या. ह्या लिंकमार्फत तुमच्या फोनवर मालवेअर पसरवले जाऊ शकते.
- सरकारी यंत्रणांमार्फत आलेल्या अथवा कोणत्याही स्रोतामार्फत आलेल्या चुकीच्या माहितीपासून सावध रहा. द गार्डियनने चुकीच्या सरकारी माहितीबद्दल, जागतिक आरोग्य संघटना आणि बीबीसीने सर्वसाधारण चुकीच्या माहितीबद्दल यापूर्वीच सूचना दिली आहे. याबाबतीत गैरसमज दूर करणारी मार्गदर्शक पुस्तिका जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
- ऑनलाईन कॉन्फरन्सिंग आणि प्रायव्हसी संबंधित सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा. फोन मधील कोणत्या सुविधा तुमची कोणती माहिती बघताहेत, आणि ते कितपत सुरक्षित आहे याबद्दल माहिती घ्या. अनेक लोक सध्या घरातून काम करत आहेत, आणि अशा परिस्थितीत बऱ्याच सुविधा हॅकर हल्ल्याला बळी पडतात.
- ज्या देशात एकाधिकारशाही राज्यव्यवस्था आहे, अशा देशातून कोविड संबंधीचे वार्तांकन करताना/ सूक्ष्म अवलोकन करताना उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबद्दल सावध रहा. सीपीजेने यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे अशा देशातील सरकारकडून माध्यमांमधील माहिती अथवा एखाद्या रोगाच्या प्रादुर्भावाबद्दलची माहिती दडपली जाऊ शकते.
प्रत्यक्ष असाईनमेंटच्या वेळची स्वसुरक्षा
- तुम्ही जर कोणत्याही वार्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करणार असाल, तर जाणार आहेत त्या ठिकाणची सुरक्षेची परिस्थिती काय आहे, याची नीट माहिती घ्या. कोविद-१९ ची महासाथ सुरु झाल्यापासून जगभरात ठिकठिकाणी मोर्चे, निषेध आणि हिंसक घटना घडलेल्या आहेत, काही पत्रकारांना गुन्हेगारी कृत्ये आणि शारीरिक हिंसेला सामोरे जावेत लागले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या भ्रमात राहू नका.
- ग्रामीण भागात वार्तांकन करत असल्यास विशेष काळजी घ्या. बाहेरच्या लोकांमुळे कोविड पसरेल अशा भीतीपोटी तुमच्याबद्दल संशय किंवा आकस असू शकतो.
- पोलिसांकडून होऊ शकणाऱ्या कोविड संदर्भातील कडक वर्तणुकीबद्दल विचार करून ठेवा. उदा. शारीरिक हिंसा अथवा अश्रुधुराचा वापर
- हुकूमशाही सरकार असणाऱ्या देशातील पत्रकारांनी वार्तांकनाच्या दरम्यान होणारी संभाव्य अटक,ताब्यात घेणे,तडीपार करणे इत्यादी शक्यतांचा विचार करून ठेवावा, असे सीपीजे ने सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय वार्तांकनाची कामगिरी
- जगभरात प्रवासावर असणाऱ्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणे अवघड झाले आहे. जर परदेशी असाइनमेंट साठी जात असाल, तर खालील गोष्टींचा विचार करा.
- प्रवासावरील निर्बंध अगदी आयत्या वेळी उद्भवू शकतात. तुम्ही जाणार असलेल्या ठिकाणचे निर्बंध तपासून पहा.
- अगदी थोड्या पूर्वसूचनेवर किंवा काही वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता स्थानिक पातळीवर टाळेबंदीची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे स्थानिक स्रोतांकडून स्थानिक माहिती घेत रहा.
- परत येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरण (क्वारंटाईन) बाबतीत सूचना ह्या अगदी थोड्याशा आगाऊ सूचनेवर किंवा कोणतीही पूर्वकल्पना न देता बदलल्या जाऊ शकतात . कोणत्या ठिकाणाहून तुम्ही परत येत आहेत, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, असे नुकतेच स्पेनहून इंग्लंडला परत येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत झालेले दिसले.
- आरोग्य कर्मचारी विशेष पूर्वकल्पना न देता निषेध अथवा संप करू शकतात, हे लक्षात घ्या.
- उत्तम प्रतीचे पीपीई किट दार वेळी उपलब्ध असेलच असे नाही. त्याची टंचाई असू शकते, किंवा मालाच्या गुणवत्तेबाबत शंका असू शकते. कोणत्याही वार्तांकनाच्या कामगिरीवर जाण्यापुरवी त्या ठिकाणी पीपीई किट च्या असलेल्या उपलब्धतेची माहिती घ्या. गरज पडल्यास तुमच्यासोबत किट घेऊन जा.
- शक्य असल्यास वार्तांकनाच्या कामगिरीवर जाण्यापुरवी कोविड-१९ लस घेऊन जा.
- तुमच्या विमा पॉलिसी एकदा नजरेखालून घाला. बहुसंख्य देशांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवास करू नका अशा प्रकारच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे बहुतेक कोविड-१९ संबंधित प्रवास विमा उतरवता येणार नाही, अशी तयारी ठेवा.
- तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी जाणार आहात, तो कार्यक्रम होणार आहे की नाही, यासंबंधी वेळोवेळी ताज्या बातम्या घेत चला. बहुतेक देशांनी ठराविक संख्येपेक्षा जास्त लोक ज्याला येतील असे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
- जगभरातील अनेक प्रदेशांच्या सीमा पूर्णतः बंद आहेत. आयत्या वेळी उघडलेल्या सीमा देखील बंद होऊ शकतात याची तुमच्या आपत्कालीन योजना तयार करताना नोंद घ्या
- तुम्ही आजारी असलात तर प्रवास करू नका. बहुतांश राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बस अथवा रेल्वे स्थानकांवर आरोग्य तपासणीचे कडक नियम केले आहेत
- जगभरातील अनेक विमान कंपन्यांना कोविड-१९ मुळे प्रचंड आर्थिक फटका बसला आहे, असे अनेक बातम्यांतून दिसून येते. त्यामुळे पूर्ण पैसे परताव्याची हमी असेल अशीच विमान तिकिटे विकत घ्या.
- तुम्हाला जिथे जायचे आहे, तिथील व्हिसाची परिस्थिती काय आहे, याची चौकशी करा. अनेक देशांनी नवीन व्हिसा देणे पूर्णतः थांबवलेले आहे.
- तुम्हाला जिथे जायचे आहे त्या देशात तुम्ही स्वतःला कोविड -१९ची लागण झालेली नसल्याचे आरोग्य प्रमाणपत्र आणावे लागेल, याची चौकशी करा
- जगभरातील विमानतळांवर कसून आरोग्य तपासणी होते आहे. त्यात शरीराचे तापमान पाहणे आणि इतर तपासण्या करण्यात येत आहेत. यासाठी लागणारा वेळ गृहीत धरून स्वतःच्या प्रवासाठी आखणी करा. काही रेल्वे स्थानके, बस स्थानके तसेच बंदरे यांनादेखील ही सूचना लागू.
असाईनमेंट संपल्यानंतर
- तुमच्यामध्ये आजाराची काही लक्षणे तर दिसत नाहीत ना, यावर नीट लक्ष ठेवा.
- जंतुसंसर्गाचा धोका जास्त आहे, अशा ठिकाणाहून परत आल्यावर तुम्हाला कदाचित स्व-विलगीकरण करून घ्यावे लागण्याची शक्यता आहे. संबंधित सरकारी सूचनांची माहिती घ्या.
- कोविड-१९ संबंधी ताजी माहिती सतत घेत रहा. तुमच्या देशात आणि तुम्हाला जायचे आहे त्या देशात चालू असलेल्या विलगीकरण प्रक्रियेबाबत माहिती घ्या.
- तुम्ही आहात त्या देशामध्ये विषाणूच्या प्रादुर्भावाची काय परिस्थिती आहे, ह्याच्यावर अवलंबून एक काम अवश्य करा. तुम्ही परत आल्यानंतर १४ दिवसांच्या काळात कोणाकोणाला भेटलात याची नोंद ठेवून एक यादी तयार करा. जर तुम्हाला रोगाची लक्षणे दिसायला लागली तर तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधायचे सरकारचे काम सोपे होईल.
तुम्हाला आजाराची लक्षणे दिसू लागल्यास
- तुम्हाला जर कितीही कमीअधिक प्रमाणात कोविड-१९ ची लक्षणे दिसू लागली, तर तुमच्या व्यवस्थापनाला कळवा आणि त्यांच्या सल्ल्याने तुमची विमानतळावरून घरी परतीची व्यवस्था करा. थेट उठून मिळेल त्या वाहनात बसू नका.
- स्वतःच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जागतिक आरोग्य संघटना, सीडीसी तसेच स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना नीट पाळा.
- तुम्हाला लक्षणे दिसू लागल्याच्या दिवसापासून निदान ७ दिवस तरी तुमचे घर सोडून बाहेर जाऊ नका. तुमच्या सरकारने दिलेल्या सूचनांनुसार ‘किती दिवस’ हा कालावधी कमी-अधिक होऊ शकतो.
- या उपायामुळे इतर लोकांना तुमच्यापासून संसर्ग होण्यास अटकाव होईल.
- आधीच नियोजन करून इतरांकडून मदत घ्या. तुमचे वरिष्ठ, मित्रपरिवार, कुटुंबीय, यांना तुमच्या गरजेच्या वस्तू आणून ठेवायला आणि तुमच्या दाराबाहेर ठेवायला सांगा.
- तुमच्या घरातील व्यक्तींपासून योग्य तेवढे शारीरिक अंतर बाळगा, आणि शक्य असल्यास एकटे झोपा.
सीपीजे तर्फे निर्माण करण्यात आलेले ऑनलाईन सुरक्षा कीट पत्रकार आणि माध्यमांना सुरक्षेसंबंधी मूलभूत मार्गदर्शन आणि माहिती पुरवण्याकरता तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये शारीरिक सुरक्षा, डिजिटल सुरक्षा आणि मानसिक काळजी यासंबंधी तसेच सामाजिक उठाव, निदर्शने तसेच निवडणुका इ. चे वार्तांकन करण्याबाबत उपयुक्त माहिती आणि उपाय आहेत.
संपादकांची सूचना: ह्या सूचना मूलतः १० फेब्रुवारी २०२० ला प्रकाशित केल्या होत्या. त्यात सातत्याने बदल करण्यात येत आहेत. सर्वात वर असलेली प्रकाशनाची तारीख पाहून ह्या सूचना किती ताज्या आहेत हे कळेल.